YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:81-128

स्तोत्रसंहिता 119:81-128 MARVBSI

तू सिद्ध केलेल्या तारणाची उत्कंठा धरून माझा जीव व्याकूळ झाला आहे, पण मी तुझ्या वचनाची आशा धरतो. तुझ्या वचनाचा ध्यास लागून माझे डोळे शिणले आहेत; “तू माझे सांत्वन केव्हा करशील” असे मी म्हणत आहे. धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखा मी झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही. तुझ्या सेवकाचे दिवस कितीसे उरले आहेत? माझ्या पाठीस लागणार्‍यांना तू कधी शासन करशील? गर्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेवल्या आहेत; ते तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे चालत नाहीत. तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत; ते खोटेपणाने माझ्या पाठीस लागले आहेत, तू मला साहाय्य कर. त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ नायनाट केला; तरी मी तुझे विधी सोडले नाहीत. तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन. हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे. तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे; तू पृथ्वी स्थापली व ती तशीच कायम आहे. तुझ्या निर्णयांविषयी म्हणावे तर ते आजपर्यंत टिकून आहेत, कारण सर्व पदार्थ तुझे सेवक आहेत. तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. तुझे विधी मी कधीही विसरणार नाही, कारण तू त्यांच्या योगे मला नवजीवन दिले आहेस. मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. दुर्जन माझा नाश करण्यास टपले आहेत; तरी मी तुझे निर्बंध ध्यानात धरीन. सर्व पूर्णतेला मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझी आज्ञा अत्यंत व्यापक आहे. अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैर्‍यांपेक्षा अधिक सुज्ञ करतात; कारण त्या सदोदित माझ्याजवळच आहेत. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे. कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करतो. वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधी पाळतो. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो. तुझ्या निर्णयांपासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकवले आहेस. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. तुझ्या विधींच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तुझे न्याय्य निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे, व ती निश्‍चित केली आहे. मी फार पिडलो आहे; हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर; तुझे निर्णय मला शिकव. मी आपला जीव नेहमी मुठीत धरून आहे, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. दुर्जनांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे, तरी तुझ्या विधींपासून मी बहकलो नाही. तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो. तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लावले आहे. मी दुटप्पी मनुष्यांचा द्वेष करतो, तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. तू माझा आश्रय व माझी ढाल आहेस; मी तुझ्या वचनाची आशा धरतो. अहो दुष्कर्म्यांनो, माझ्यापासून दूर व्हा म्हणजे मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन. तू आपल्या वचनानुसार मला सांभाळ, म्हणजे मी जगेन; माझ्या आशेसंबंधाने मला फजीत होऊ देऊ नकोस. मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन, आणि तुझ्या नियमांकडे निरंतर लक्ष ठेवीन. तुझ्या नियमांपासून बहकणार्‍या सर्वांचा तू धिक्कार करतोस; त्यांचे कपट निरर्थक आहे. पृथ्वीवरील सर्व दुर्जनांस तू गाळासारखे दूर करतोस; म्हणून तुझे निर्बंध मला प्रिय आहेत. तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो; तुझ्या निर्णयांना मी भितो. मी न्याय व नीती आचरली आहे; माझा छळ करणार्‍यांच्या हाती मला सोडून देऊ नकोस. तू आपल्या दासाच्या हितासाठी जामीन हो; गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नकोस. तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतीक्षा करून करून माझे डोळे शिणले आहेत. तू आपल्या वात्सल्यास अनुसरून आपल्या दासाला वागवून घे, आणि तू आपले नियम मला शिकव. मी तुझा दास आहे, मला तुझ्या निर्बंधांचे ज्ञान व्हावे म्हणून तू मला बुद्धी दे. परमेश्वराची कार्य करण्याची वेळ आली आहे, कारण त्यांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे; ह्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो. ह्यामुळे सर्व बाबीसंबंधाने तुझे सर्व विधी यथायोग्य आहेत असे मी मानतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करतो.