तू आपल्या दासाला दिलेले वचन आठव, कारण तू मला आशा लावली आहेस. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते. गर्विष्ठांनी माझा फार उपहास केला, तरी मी तुझ्या नियमशास्त्रापासून बहकलो नाही. हे परमेश्वरा, तुझे पुरातन निर्णय आठवून माझे समाधान झाले आहे. दुर्जन तुझ्या नियमशास्त्राचा त्याग करतात, म्हणून मला फार संताप येतो. माझ्या संसारयात्रेत तुझे नियम मला गीतरूप झाले आहेत. हे परमेश्वरा, मी रात्री तुझ्या नावाचे स्मरण केले आहे. आणि तुझे नियमशास्त्र पाळले आहे. मी तुझे विधी आचरले आहेत म्हणून मला हे प्राप्त झाले आहे. परमेश्वर माझा वाटा आहे. तुझी वचने पाळण्याचा मी निश्चय केला आहे. मी अगदी मनापासून तुझ्या आशीर्वादाची याचना केली आहे. आपल्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर. आपल्या वर्तनक्रमाविषयी विचार करून मी तुझ्या निर्बंधांकडे पावले वळवली. मी तुझ्या आज्ञा पाळण्याची त्वरा केली, मी विलंब लावला नाही. दुर्जनांच्या पाशांनी मला वेष्टले, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुझे उपकारस्मरण करण्यास मी मध्यरात्री उठतो. तुझे भय धरणार्या सर्वांचा, तुझे विधी पाळणार्यांचा, मी सोबती आहे. हे परमेश्वरा, तुझ्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे; तू आपले नियम मला शिकव. हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहेस. विवेक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे. मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळत आहे. तू चांगला आहेस, तू चांगले करतोस. तुझे नियम मला शिकव. गर्विष्ठांनी माझ्यावर आळ घेतला आहे; तरी मी अगदी मनापासून तुझे विधी पाळीन. त्यांचे मन कठीण झाले आहे; मी तर तुझ्या नियमशास्त्रात रमून गेलो आहे. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले; कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. सोन्यारुप्याच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे.
स्तोत्रसंहिता 119 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 119
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 119:49-72
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ