YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:121-176

स्तोत्रसंहिता 119:121-176 MARVBSI

मी न्याय व नीती आचरली आहे; माझा छळ करणार्‍यांच्या हाती मला सोडून देऊ नकोस. तू आपल्या दासाच्या हितासाठी जामीन हो; गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नकोस. तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतीक्षा करून करून माझे डोळे शिणले आहेत. तू आपल्या वात्सल्यास अनुसरून आपल्या दासाला वागवून घे, आणि तू आपले नियम मला शिकव. मी तुझा दास आहे, मला तुझ्या निर्बंधांचे ज्ञान व्हावे म्हणून तू मला बुद्धी दे. परमेश्वराची कार्य करण्याची वेळ आली आहे, कारण त्यांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे; ह्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो. ह्यामुळे सर्व बाबीसंबंधाने तुझे सर्व विधी यथायोग्य आहेत असे मी मानतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करतो. तुझे निर्बंध आश्‍चर्यकारक आहेत, म्हणून माझा जीव ते पाळतो. तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. मी तोंड उघडून धापा टाकल्या, कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला. तू माझ्याकडे वळ आणि आपल्या नावाची आवड धरणार्‍यांवर करतोस तशी कृपा माझ्यावर कर. तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर, आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नकोस. मनुष्याच्या जुलमापासून मला मुक्त कर, म्हणजे मी तुझे विधी पाळीन. तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड; आणि तुझे नियम मला शिकव. लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह वाहतात. हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस; तुझे निर्णय सरळ आहेत. तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत. माझ्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, कारण माझे शत्रू तुझी वचने विसरले आहेत. तुझे वचन अगदी शुद्ध आहे; ते तुझ्या दासाला प्रिय आहे; मी क्षुद्र व तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही. तुझे न्याय्यत्व हे सनातन न्याय्यत्व आहे, आणि तुझे नियमशास्त्र सत्य आहे. संकट व क्लेश ह्यांनी मला घेरले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे. तुझे निर्बंध निरंतर न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन. मी अगदी मनापासून तुझा धावा करतो; हे परमेश्वरा, माझे ऐक; मी तुझे नियम पाळीन. मी तुझा धावा करतो; तू मला तार, म्हणजे मी तुझे निर्बंध पाळीन. उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारतो; मी तुझ्या वचनांची आशा धरतो. तुझ्या वचनाचे चिंतन करायला रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. तू आपल्या वात्सल्यास अनुसरून माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे. दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत; ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत. हे परमेश्वरा, तू जवळ आहेस; तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. तुझ्या निर्बंधांवरून मला पूर्वीपासून ठाऊक आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापले आहेत. माझे दुःख पाहा, त्यापासून मला सोडव; कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. माझा वाद तू चालव, मला मुक्त कर; तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. तारण दुर्जनांपासून दूर आहे; कारण ते तुझ्या नियमांचा आश्रय करीत नाहीत. हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे; तू आपल्या निर्णयांना अनुसरून मला नवजीवन दे. माझ्या पाठीस लागणारे व माझे शत्रू पुष्कळ आहेत. तरी मी तुझ्या निर्बंधांपासून ढळलो नाही. विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे, कारण ते तुझे वचन पाळत नाहीत. तुझे विधी मी किती प्रिय मानतो ते पाहा; हे परमेश्वरा, तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे. तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे; तुझे सर्व न्याय्य निर्णय सनातन आहेत. अधिपती माझ्या पाठीस विनाकारण लागले आहेत; परंतु माझे हृदय तुझ्या वचनांचे भय धरते. मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो तसा तुझ्या वचनाविषयी मला आनंद होतो. मी असत्याचा द्वेष करतो व त्याचा वीट मानतो; परंतु तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. तुझ्या न्याय्य निर्णयांसाठी मी दिवसातून सात वेळा तुझे स्तवन करतो. तुझे नियमशास्त्र प्रिय मानणार्‍यांना फार शांती असते. त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही. हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी प्रतीक्षा करीत आहे; तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत. माझा जीव तुझे निर्बंध पाळतो; व ते मला अत्यंत प्रिय आहेत. मी तुझे विधी व तुझे निर्बंध पाळतो; कारण माझा सर्व वर्तनक्रम तुझ्यापुढे आहे. हे परमेश्वरा, माझी आरोळी तुझ्यापर्यंत पोहचो; तू आपल्या वचनानुसार मला बुद्धी दे. माझी विनंती तुझ्यापुढे येवो; तू आपल्या वचनानुसार मला मुक्त कर. तू मला आपले नियम शिकवतोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो. माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत. तुझा हात मला साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण मी तुझे विधी स्वीकारले आहेत. हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी उत्कंठा धरली आहे; तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे. माझा जीव वाचो, म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला साहाय्य करोत. हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे; तू आपल्या दासाचा शोध कर; कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही.