YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 106:7-28

स्तोत्रसंहिता 106:7-28 MARVBSI

आमच्या पूर्वजांनी मिसर देशात असताना तुझ्या अद्भुत कृत्यांकडे लक्ष दिले नाही, तुझ्या दयेच्या अनेक कृत्यांचे स्मरण केले नाही. तर समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळ ते फितूर झाले. तरी आपला पराक्रम विदित करावा म्हणून, त्याने आपल्या नावासाठी त्यांचे तारण केले. त्याने तांबड्या समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला, आणि मैदानावरून चालावे तसे त्या जलाशयाच्या खोल स्थलांवरून त्याने त्यांना चालवले. त्याने त्यांना त्यांचा द्वेष करणार्‍याच्या हातून सोडवले. शत्रूच्या हातून त्यांना मुक्त केले. त्यांचे वैरी पाण्यात गडप झाले, त्यांच्यातला कोणीही उरला नाही. तेव्हा त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला; त्यांनी त्याची स्तोत्रे गाइली. तरी ते त्याची कृत्ये लवकरच विसरले; त्याच्या योजनेसंबंधाने त्यांनी धीर धरला नाही. रानात त्यांची वासना अनावर झाली; ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली. तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना दिले, पण त्यांचा जीव झुरणीस लावला. त्यांनी छावणीत मोशे आणि परमेश्वराचा पवित्र सेवक अहरोन ह्यांचा हेवा केला. तेव्हा भूमी फाटली व तिने दाथानाला गिळून टाकले, आणि अबिरामाच्या टोळीस गडप केले; त्याच्या टोळीस अग्नीने पछाडले, आगीच्या लोळाने त्या दुर्जनांना जाळून टाकले. त्यांनी होरेब येथे वासराची मूर्ती केली, ओतीव मूर्तीची पूजा केली. त्यांनी आपले ऐश्वर्य जो परमेश्वर त्याच्याऐवजी गवत खाणार्‍या बैलाची प्रतिमा स्वीकारली. ते आपल्या उद्धारक देवाला विसरले; त्याने मिसर देशात महत्कृत्ये, हामाच्या देशात अद्भुत कृत्ये, तांबड्या समुद्राजवळ भयानक कृत्ये केली होती. तेव्हा तो म्हणाला, ह्यांचा नायनाट केला पाहिजे; पण त्याचा क्रोध शांत करावा, व त्याने त्यांचा नाश करू नये, म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला. त्यांनी रम्य देश तुच्छ मानला; त्यांनी त्याच्या वचनांवर विश्वास ठेवला नाही. त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली. परमेश्वराचा शब्द मानला नाही. तेव्हा त्याने आपला हात वर करून त्यांच्याविषयी शपथ वाहिली की, मी त्यांना रानात खाली पाडीन, त्यांची संतती राष्ट्रांत विखरीन, त्यांना देशोधडीस लावीन. ते पौर येथील बआल ह्या दैवतावर आसक्त झाले; त्यांनी निर्जीव मूर्तींना वाहिलेले बळी खाल्ले.