YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 106:18-48

स्तोत्रसंहिता 106:18-48 MARVBSI

त्याच्या टोळीस अग्नीने पछाडले, आगीच्या लोळाने त्या दुर्जनांना जाळून टाकले. त्यांनी होरेब येथे वासराची मूर्ती केली, ओतीव मूर्तीची पूजा केली. त्यांनी आपले ऐश्वर्य जो परमेश्वर त्याच्याऐवजी गवत खाणार्‍या बैलाची प्रतिमा स्वीकारली. ते आपल्या उद्धारक देवाला विसरले; त्याने मिसर देशात महत्कृत्ये, हामाच्या देशात अद्भुत कृत्ये, तांबड्या समुद्राजवळ भयानक कृत्ये केली होती. तेव्हा तो म्हणाला, ह्यांचा नायनाट केला पाहिजे; पण त्याचा क्रोध शांत करावा, व त्याने त्यांचा नाश करू नये, म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला. त्यांनी रम्य देश तुच्छ मानला; त्यांनी त्याच्या वचनांवर विश्वास ठेवला नाही. त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली. परमेश्वराचा शब्द मानला नाही. तेव्हा त्याने आपला हात वर करून त्यांच्याविषयी शपथ वाहिली की, मी त्यांना रानात खाली पाडीन, त्यांची संतती राष्ट्रांत विखरीन, त्यांना देशोधडीस लावीन. ते पौर येथील बआल ह्या दैवतावर आसक्त झाले; त्यांनी निर्जीव मूर्तींना वाहिलेले बळी खाल्ले. त्यांनी आपल्या कृत्यांनी त्याला क्रोध आणला म्हणून त्यांच्यामध्ये पटकी सुरू झाली. तेव्हा फीनहासाने पुढे होऊन मध्यस्थी केली; आणि पटकी बंद झाली. हे त्याला नीतिमत्त्व असे पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले. मरीबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला, आणि त्यांच्यामुळे मोशेवर अरिष्ट आले; कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला, आणि त्याने अविचाराचे शब्द तोंडातून काढले. परमेश्वराच्या आज्ञेचे त्यांनी उल्लंघन केले, म्हणजे त्यांनी इतर राष्ट्रांचा विध्वंस केला नाही, तर ते त्या राष्ट्रांत मिसळले, आणि त्यांचे आचार शिकले, त्यांनी त्यांच्या मूर्तींची पूजा केली; त्या त्यांना पाशरूप झाल्या. त्यांनी आपले पुत्र व कन्या ह्यांचे बळी भुतांना दिले; त्यांनी निरपराध्यांचा रक्तपात केला, म्हणजे आपले पुत्र व कन्या ह्यांचे रक्त पाडले; त्यांनी कनानाच्या मूर्तींना त्यांचे बळी दिले; असे करून त्यांनी रक्ताने भूमी विटाळली. ते आपल्या कृत्यांनी भ्रष्ट झाले; ते आपल्या कृतींनी अनाचारी बनले. त्यामुळे परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला; त्याला आपल्या वतनाचा वीट आला. त्याने त्यांना राष्ट्रांच्या हाती दिले; त्यांच्या द्वेष्ट्यांनी त्यांच्यावर राज्य केले. त्यांच्या शत्रूंनी त्यांना छळले; ते त्यांच्या हाताखाली दडपून गेले. अनेक वेळा त्याने त्यांना मुक्त केले तरी ते आपला हेका न सोडता बंडखोरच राहिले, व आपल्या अनीतीने अधोगतीस पोहचले. तथापि त्यांची आरोळी ऐकून परमेश्वराने त्यांच्या संकटाकडे दृष्टी लावली; त्याने आपल्या कराराचे स्मरण त्यांच्यासाठी करून आपल्या अपार दयेने त्यांची कीव केली. त्यांचा पाडाव करणार्‍या सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी त्याने दया उत्पन्न केली. हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हांला तार, आम्हांला राष्ट्रांतून काढून एकवट कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे स्तवन करू, तुझ्या स्तवनात आम्हांला उल्लास वाटेल. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा अनादि कालापासून अनंतकालपर्यंत धन्यवाद होवो. सर्व लोक “आमेन” म्हणोत. परमेशाचे स्तवन करा!1