YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 5:1-19

नीतिसूत्रे 5:1-19 MARVBSI

माझ्या मुला, तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे, म्हणून तू माझ्या ज्ञानशिक्षणाकडे लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे. कारण परस्त्रीच्या ओठांतून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते; तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते. तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले अधोलोकास लागतात; म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही; तिचे मार्ग डळमळीत आहेत, हे तिला कळत नाही. तर आता मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडची वचने सोडू नका. तिच्याकडची वाट सोडून दे, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस; गेलास तर तुझी अब्रू दुसर्‍यांच्या हाती जाईल; आणि तुझ्या आयुष्याचे दिवस निष्ठुरांच्या हाती जातील; तुझ्या धनाने परके गबर होतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसर्‍याच्या घरात जाईल; आणि परिणामी तुझा देह व तुझी शक्ती क्षीण झाल्यावर तू शोक करशील; आणि मग तू येणेप्रमाणे म्हणशील : “मी शिक्षणाचा द्वेष कसा केला? माझ्या अंत:करणाने शासन कसे तुच्छ मानले? मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही. मंडळी व सभा ह्यांच्यादेखत मी बहुतेक दुष्कर्मात गढलेला असे.” तू आपल्याच टाकीतले पाणी पी. आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी. तुझे झरे बाहेर वाहून जावेत काय? तुझे जलाचे प्रवाह रस्त्यांवरून वाहावेत काय? ते केवळ तुझ्यासाठीच असोत; तुझ्याबरोबर दुसर्‍यांना त्यांचा उपयोग न घडो. तुझ्या झर्‍याला आशीर्वाद प्राप्त होवो; तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट राहा. रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी ह्यांप्रमाणेच तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो.