YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 30:17-33

नीतिसूत्रे 30:17-33 MARVBSI

जो डोळा बापाची थट्टा करतो, आईचे ऐकणे तुच्छ मानतो, त्याला खोर्‍यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील, त्याला गिधाडांची पिले खाऊन टाकतील. तीन गोष्टी माझ्या समजापलीकडे आहेत, चार मला कळत नाहीत : गरुडाचे आकाशात उडणे, सर्पाचे खडकावर सरपटणे, जहाजाचे समुद्रावर चालणे, व पुरुषाचा तरुणीशी संबंध. जारिणीचा रिवाज असा असतो : ती खाऊनपिऊन तोंड पुसते, आणि म्हणते, “मी काही दुष्कर्म केले नाही.” तीन गोष्टींनी भूमी कंपित होते, चार्‍हींचा भार तिला सहन होत नाही; त्या ह्या : राजा झालेला दास, अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख, लग्न झालेली त्रासदायक स्त्री, व धनिणीची वारस झालेली दासी. लहान व अत्यंत शहाणे असे चार प्राणी पृथ्वीवर आहेत : मुंग्या अशक्त कीटक आहेत, तरी उन्हाळ्यात त्या आपले अन्न साठवून ठेवतात. ससे हे सशक्त प्राणी नाहीत, तरी ते खडकांत आपली बिळे करतात; टोळांना कोणी राजा नाही, तरी ते टोळ्या करून एकदम उडतात. पाल हाताने धरता येते; तरी ती राजमहालात असते. डौलदार चालणारे तीन प्राणी आहेत, चौघांची चाल सुरेख आहे. ते हे : सर्व वनपशूंत बलवान व कोणालाही पाठ न दाखवणारा सिंह; कसलेला शिकारी कुत्रा, बोकड व सैन्याबरोबर असलेला राजा. तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केलेस, अथवा मनात दुष्कर्म योजलेस; तर तू आपल्या मुखावर हात ठेव. दूध घुसळल्याने लोणी निघते नाक पिळल्याने रक्त निघते, तसा राग चेतवल्याने तंटा उपस्थित होतो.