YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 2:1-15

नीतिसूत्रे 2:1-15 MARVBSI

माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करशील, व गुप्त निधींप्रमाणे त्याला उमगून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान परमेश्वर देतो; त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात; सरळांसाठी तो यश:प्राप्ती सुलभ करतो; सात्त्विकपणे चालणार्‍यांना तो ढाल आहे; अशासाठी की त्याने नीतिमार्गांचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा. नीतिमत्ता, न्याय व सात्त्विकता अशा सर्व सन्मार्गांची तुला जाणीव घडेल. कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल; विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला सांभाळील; म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणार्‍या मनुष्यांपासून, तो तुला दूर ठेवील; ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गांनी चालतात; त्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो, दुष्कर्माच्या कुटिलतेवरून ते उल्लास पावतात; त्यांचे मार्ग वाकडे आहेत, त्यांच्या वाटा विपरीत आहेत.