YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 16:1-33

नीतिसूत्रे 16:1-33 MARVBSI

मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिव्हेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. परमेश्वराने सर्वकाही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो; त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो. दया व सत्य ह्यांच्या योगाने पापाचे क्षालन होते, आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याशी समेट करायला लावतो. अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीहून, न्यायाने कमावलेले थोडे बरे. मनुष्याचे मन मार्ग योजते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना मार्ग दाखवतो. दैवी निर्णय राजाच्या ओठी असतात, न्याय करताना त्याचे मुख अन्याय करीत नाही. खरी तागडी व खरी पारडी परमेश्वराची आहेत; पिशवीतील सर्व वजने त्याचीच आहेत. दुष्कर्मे करणे राजांना अमंगल आहे; कारण गादी नीतिमत्तेनेच स्थिर राहते. नीतिमत्तेची वाणी राजांना आनंद देणारी आहे, यथान्याय बोलणार्‍यावर ते प्रेम करतात. राजाचा संताप मृत्युदूतांसारखा आहे; सुज्ञ मनुष्य त्याचे शमन करतो. राजाच्या मुखतेजात जीवन आहे; त्याची प्रसन्नता सरत्या पावसाच्या मेघासारखी आहे. ज्ञानप्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे! सुज्ञता संपादन करणे रुप्यापेक्षा इष्ट आहे. दुष्कर्मापासून दूर राहणे हा सरळांचा धोपट मार्ग होय; जो आपला मार्ग धरून राहतो तो आपला जीव राखतो. गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे. जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते; जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. जो मनाचा सुज्ञ त्याला समंजस म्हणतात. मधुर वाणीने शिक्षणाचा संस्कार अधिक होतो. ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याला ती जीवनाच्या झर्‍याप्रमाणे होय. पण मूर्खांची मूर्खता हीच त्यांचे शासन होय. ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालते. ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांना आरोग्य देणारी आहेत. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो. पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात. मजुराची क्षुधा त्याच्या हातून मजुरी करवते, कारण त्याचे तोंड त्याला ती करायला लावते. अधम कुयुक्ती उकरून काढतो; त्याच्या वाणीत जशी काय जळती आग असते. कुटिल मनुष्य वैमनस्य पसरतो; कानास लागणारा मोठ्या स्नेह्यांत फूट पाडतो. उद्दाम मनुष्य आपल्या शेजार्‍याला भुलथाप देऊन कुमार्गास लावतो. कुटिल कल्पना योजण्याला जो डोळे मिचकावतो व ओठ चावतो तो दुष्कर्म घडवून आणतो. पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; नीतिमत्तेच्या मार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो; ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणार्‍यापेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणार्‍यापेक्षा श्रेष्ठ होय. पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून होतो.