YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 32:1-32

गणना 32:1-32 MARVBSI

रऊबेनाच्या तसेच गादाच्या वंशजांजवळ गुराढोरांची फार मोठी खिल्लारे होती; याजेर प्रांत व गिलाद प्रांत त्यांनी पाहिले तेव्हा गुराढोरांसाठी ते उत्तम प्रदेश आहेत असे त्यांना दिसले. म्हणून गादाचे वंशज व रऊबेनाचे वंशज हे मोशे, एलाजार याजक आणि मंडळीचे सरदार ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, “अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन ह्यांचा जो प्रांत परमेश्वराने इस्राएलाच्या मंडळीसमक्ष पादाक्रांत केला तो गुराढोरांसाठी चांगला आहे आणि तुझ्या दासांजवळ गुरेढोरे आहेत.” ते पुढे म्हणाले, “तुझी कृपादृष्टी आमच्यावर असली तर हा प्रदेश तुझ्या दासांना वतन करून दे; आम्हांला यार्देनेपलीकडे नेऊ नकोस.” गादाच्या वंशजांना व रऊबेनाच्या वंशजांना मोशे म्हणाला, “तुमचे भाऊबंद युद्धास जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार की काय? जो देश परमेश्वराने इस्राएल लोकांना दिला आहे तेथे उतरून जाण्याबाबत त्यांचे मन तुम्ही निरुत्साही का करता? तो देश पाहायला कादेश-बर्ण्याहून तुमच्या वडिलांना मी पाठवले होते तेव्हा त्यांनीही तसेच केले. त्यांनी अष्कोल नाल्यापर्यंत जाऊन देश पाहिला तेव्हा परमेश्वराने जो देश इस्राएल लोकांना दिला होता त्यात त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांचे मन त्यांनी निरुत्साही केले. त्या दिवशी परमेश्वराचा क्रोध भडकला आणि त्याने शपथ वाहिली की, ‘मिसर देशातून निघालेल्या लोकांपैकी वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जे आहेत त्यांतील कोणीही अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश देण्याची मी शपथ वाहिली होती तो देश पाहणार नाहीत, कारण ते मला पूर्णपणे अनुसरले नाहीत; कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र तो देश पाहतील, कारण ते परमेश्वराला पूर्णपणे अनुसरले आहेत.’ परमेश्वराचा क्रोध इस्राएलावर भडकला आणि ज्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कर्म केले होते त्यांची सर्व पिढी नष्ट होईपर्यंत त्याने त्यांना रानात चाळीस वर्षे भटकायला लावले. आता पाहा, इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध आणखी भडकावा म्हणून तुम्ही आपल्या वडिलांच्या जागी त्यांची पातकी पोरे निपजला आहात. तुम्ही त्याला सोडून बहकला तर तो त्यांना पुन्हा रानातच सोडून देईल आणि तुम्ही ह्या सर्व लोकांचा नाश कराल.” मग ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले, “आम्ही आमच्या गुराढोरांसाठी येथे वाडे बांधू आणि आमच्या मुलाबाळांसाठी नगरे वसवू; तरी इस्राएल लोकांना स्वस्थानी नेऊन पोचवीपर्यंत आम्ही स्वत: हत्यारबंद होऊन त्यांच्या आघाडीस चालू; मात्र आमची मुलेबाळे ह्या देशातील लोकांच्या भीतीमुळे तटबंदी नगरात राहतील. इस्राएल लोकांना आपापले वतन मिळेपर्यंत आम्ही घरी परतणार नाही. आम्ही त्यांच्याबरोबर यार्देनेच्या पैलतीरी किंवा त्यांच्याही पलीकडे वतन घेणार नाही; कारण यार्देनेच्या अलीकडे उगवतीस आमचा हिस्सा आम्हांला मिळाला आहे.” तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “जर तुम्ही ही गोष्ट कराल, म्हणजे जर तुम्ही युद्ध करण्यासाठी परमेश्वरापुढे सशस्त्र व्हाल, आणि परमेश्वर आपल्या शत्रूंना आपल्यासमोरून हाकून देईपर्यंत यार्देनेपलीकडे तुमचा प्रत्येक सशस्त्र पुरुष परमेश्वरापुढे चालेल, तर तो देश परमेश्वराच्या स्वाधीन झाल्यानंतर तुम्हांला परत येता येईल आणि परमेश्वराच्या व इस्राएलाच्या ऋणातून तुम्ही मुक्त व्हाल, आणि हा देश परमेश्वरासमक्ष तुमचे वतन होईल. असे न कराल तर पाहा, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हांला भोवेल हे पक्के लक्षात ठेवा. तर तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी नगरे वसवा आणि आपल्या शेरडामेंढरांसाठी वाडे बांधा; आणि तुम्ही शब्द दिला तो पाळा.” तेव्हा गादाचे वंशज व रऊबेनाचे वंशज हे मोशेला म्हणाले, “स्वामीच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे दास करतील. आमची मुलेबाळे, स्त्रिया, शेरडेमेंढरे व गुरेढोरे गिलादातील नगरात राहतील; पण स्वामीच्या सांगण्याप्रमाणे त्याचा प्रत्येक दास युद्धासाठी सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे युद्ध करायला पलीकडे जाईल.” तेव्हा मोशेने एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएल लोकांच्या वंशांच्या वाडवडिलांच्या घराण्यातले प्रमुख ह्यांना त्यांच्यासंबंधाने आज्ञा केली. मोशे त्यांना म्हणाला, “जर गादाच्या व रऊबेनाच्या वंशजांतील प्रत्येक पुरुष सशस्त्र होऊन तुमच्याबरोबर परमेश्वरापुढे यार्देनेपलीकडे गेला व देश तुमच्या ताब्यात आला, तर तुम्ही त्यांना गिलाद प्रदेश वतन करून द्यावा; पण तुमच्याबरोबर सशस्त्र होऊन ते पलीकडे गेले नाहीत तर कनान देशात त्यांना तुमच्याबरोबर वतन मिळावे.” तेव्हा गादाच्या वंशजांनी व रऊबेनाच्या वंशजांनी उत्तर दिले की, “परमेश्वराने आम्हा तुझ्या दासांना सांगितले तसे आम्ही करू. आम्ही स्वतः सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ, पण आमचे वतन यार्देनेच्या पूर्वेसच असावे.”