मग येशूवा, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या व पथह्या हे लेवी म्हणाले, “उभे राहा आणि आपला देव परमेश्वर ह्याचा येणेप्रमाणे धन्यवाद अनंतकाळ करा : तुझे वैभवशाली नाम धन्य असो; ते सर्व धन्यवाद व स्तवन ह्यांपलीकडे आहे.
तूच एक परमेश्वर आहेस; आकाश व अत्युच्च आकाश व त्यांतील सर्व नक्षत्रगण, पृथ्वी व तिच्यावर वसणारे सर्व, जलाशय त्यांत असलेले सर्वकाही ह्यांचा तू उत्पन्नकर्ता व पालनकर्ता आहेस; स्वर्गातील सेना तुला नमन करते.
हे परमेश्वरा, तूच देव आहेस; तू अब्रामास निवडून घेऊन खास्द्यांच्या ऊर गावातून बाहेर आणले व त्याला अब्राहाम हे नाव दिले.
आणि त्याचे अंत:करण तुझ्यासंबंधाने एकनिष्ठ आहे असे पाहून तू त्याच्याशी करार केलास की मी तुझ्या वंशजांना कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी व गिर्गाशी ह्यांचा देश देईन; तू हे आपले वचन पुरे केले आहेस, कारण तू न्यायी आहेस;
नंतर तू मिसर देशात आमच्या पूर्वजांचे कष्ट पाहिले व तांबड्या समुद्राच्या तीरी त्यांचा धावा ऐकला;
फारो, त्याचे सेवक, त्याच्या देशाचे सर्व लोक ह्यांना चिन्हे व अद्भुत कृत्ये तू दाखवलीस; कारण ते त्यांच्याशी गर्वाने वागत होते हे तुला ठाऊक होते; तू आपल्या नामाचा महिमा प्रकट केला; तो आजवर आहे.
तू त्यांच्यासमोरून समुद्र दुभंग केला, असा की ते समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून चालून गेले; धोंडा महाजलाशयात टाकावा त्याप्रमाणे तू त्यांचा पाठलाग करणार्यांना समुद्रतळी फेकले.
तू त्यांना दिवसा मेघस्तंभाने आणि रात्री ज्या वाटेने त्यांनी जायचे तिच्यावर प्रकाश मिळावा म्हणून अग्निस्तंभाने त्यांना नेले.
तू सीनाय पर्वतावर उतरून त्यांच्याशी स्वर्गातून बोललास आणि त्यांना योग्य निर्णय, खरे कायदे, चांगले नियम व आज्ञा लावून दिल्या;
तू त्यांना आपल्या पवित्र शब्बाथाचा परिचय करून दिला, आणि तुझा सेवक मोशे ह्याच्या हस्ते तू त्यांना आज्ञा, नियम व नियमशास्त्र ही विहित केली.
आणि त्यांची क्षुधा भागवण्यासाठी तू आकाशातून त्यांना अन्न दिले, त्यांची तृषा शमवण्यासाठी खडकातून पाणी काढले आणि त्यांना अशी आज्ञा केली की जो देश तुम्हांला देण्यासाठी मी बाहू उभारून आणभाक केली आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तुम्ही त्यात जा.
तथापि त्यांनी व आमच्या पूर्वजांनी उन्मत्त होऊन आपली मान ताठ केली व तुझ्या आज्ञांचा अवमान केला;
त्यांनी हुकूम मानण्याचे नाकारले, आणि जी आश्चर्यकृत्ये तू त्यांच्यामध्ये केली होतीस त्यांची त्यांनी पर्वा केली नाही; पण त्यांनी आपली मान ताठ करून एवढे बंड केले की आपल्या दास्यात परत जाण्यासाठी त्यांनी एक नायक नेमला; पण तू क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव आहेस; तू त्यांचा त्याग केला नाहीस.
त्यांनी ओतीव वासरू केले व ज्या देवाने तुला मिसर देशातून सोडवून आणले तोच हा असे म्हणून तुला संताप आणणारी कामे केली.