पुढे ते कफर्णहूमात आले; आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, “तुम्ही वाटेत कसली चर्चा करत होता?” ते गप्प राहिले, कारण सर्वांत मोठा कोण ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती. त्याने बसून त्या बारा जणांना बोलावून म्हटले, “जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वांत शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.” मग त्याने एक बालक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले व त्याला कवटाळून त्यांना तो म्हणाला, “जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, व जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.” योहान त्याला म्हणाला, “गुरूजी, आपला अनुयायी नसलेल्या कोणाएकाला आम्ही आपल्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता.” येशू म्हणाला, “त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने महत्कृत्ये करून लगेचच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हांला पेलाभर पाणी पिण्यास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही, हे मी तुम्हांला खचीत सांगतो. माझ्यावर विश्वास ठेवणार्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे. तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक; दोन हात असून नरकात म्हणजे न विझणार्या अग्नीत जावे, ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक; दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक; दोन डोळे असून जेथे ‘त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही’ अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एकडोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल, [व प्रत्येक बलिदान मिठाने खारवतील]. मीठ चांगला पदार्थ आहे; परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणाल? तुम्ही आपल्यामध्ये मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा.”
मार्क 9 वाचा
ऐका मार्क 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 9:33-50
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ