YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 8:1-12

मार्क 8:1-12 MARVBSI

त्या दिवसांत पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता व त्यांच्याजवळ खायला काही नव्हते, म्हणून येशूने आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले, “मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व त्यांच्याजवळ खायला काही नाही; मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील; त्यांच्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत.” त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्यात?” त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.” नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्यास सांगितले. त्या सात भाकरी घेतल्या व उपकारस्तुती करून त्या मोडल्या व वाढण्याकरता आपल्या शिष्यांजवळ दिल्या; आणि त्यांनी त्या लोकांना वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते; त्यांवर त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढण्यास सांगितले. ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या त्यांनी भरून घेतल्या. तेथे सुमारे चार हजार लोक होते. मग त्याने त्यांना निरोप दिला. नंतर लगेच तो आपल्या शिष्यांसह मचव्यात बसून दल्मनुथा प्रांतात आला. मग परूशी येऊन त्याच्याशी वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले. तेव्हा तो आपल्या आत्म्यात विव्हळ होऊन म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हांला खचीत सांगतो की ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही.”