मार्क 4:30-41
मार्क 4:30-41 MARVBSI
आणखी तो म्हणाला, “आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला, तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की ‘आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते.” असले पुष्कळ दाखले देऊन, त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे. आणि दाखल्यांवाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे; तथापि एकान्तात तो आपल्या शिष्यांना सर्वकाही समजावून सांगत असे. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपण पलीकडे जाऊ या.” तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर, तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता; तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, “गुरूजी, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय?” तेव्हा त्याने उठून वार्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, “उगा राहा, शांत हो.” मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हांला विश्वास कसा नाही?” तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हेदेखील ह्याचे ऐकतात.”

