YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 3:1-33

मार्क 3:1-33 MARVBSI

मग तो पुन्हा एका सभास्थानात गेला; तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्बाथ दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहण्यास ते टपून बसले होते. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, “ऊठ, मध्ये उभा राहा.” मग तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यांतून कोणते सशास्त्र आहे?” पण ते उगेच राहिले. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. मग परूशी बाहेर जाऊन त्याचा (येशूचा) घात कसा करावा ह्याविषयी लगेचच हेरोदीयांबरोबर त्याच्याविरुद्ध मसलत करीत बसले. मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला; आणि गालीलातून मोठा समुदाय मागोमाग निघाला; यहूदीया, यरुशलेम, इदोम व यार्देनेच्या पलीकडचा प्रांत आणि सोर व सीदोन ह्यांच्या आसपासचा प्रदेश ह्यांतूनही मोठा समुदाय, जी मोठमोठी कामे तो करत होता त्यांविषयी ऐकून त्याच्याकडे आला. तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले. कारण त्याने अनेकांना बरे केले होते, म्हणून जे रोगाने पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करण्यास त्याच्या अंगावर पडत होते. जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहत तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत की, “तू देवाचा पुत्र आहेस.” तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की, “मला प्रकट करू नका.” मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली; अशासाठी की, त्यांनी त्याच्याबरोबर असावे, व रोग बरे करण्याचा व भुते काढण्याचा अधिकार देऊन, उपदेश करण्यास त्यांना पाठवावे. त्याने ह्या बारा जणांची नेमणूक केली व शिमोनाला पेत्र हे आणखी एक नाव दिले. जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले; अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी, व त्याला धरून देणारा यहूदा इस्कर्योत. मग तो घरी आला; तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवायलाही सवड होईना. हे ऐकून त्याचे आप्त त्याला धरायला निघाले; कारण “त्याला वेड लागले आहे” असे त्यांचे म्हणणे होते. तसेच यरुशलेमेहून आलेले शास्त्री म्हणत होते की, “त्याला बालजबूल लागला आहे व तो त्या भुतांच्या अधिकार्‍याच्या साहाय्याने भुते काढतो.” तेव्हा तो त्यांना आपणाजवळ बोलावून म्हणू लागला की, “सैतान सैतानाला कसा काढील? आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही. आपसांत फूट पडलेले घरही टिकत नाही. सैतान स्वतःवरच उठला व त्याच्यात फूट पडली तर तोही टिकणार नाही, त्याचा शेवट होणार. बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही; त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. मी तुम्हांला खचीत सांगतो की, मानवपुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणांची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे.” “त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे,” असे ते म्हणत होते म्हणून तो हे बोलला. तेव्हा त्याची आई व त्याचे भाऊ आले, आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले. त्याच्याभोवती पुष्कळ लोक बसले होते; ते त्याला म्हणाले, “पाहा, बाहेर आपली आई व आपले भाऊ आपला शोध करीत आहेत.” त्याने त्यांना उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?”