YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 2:13-28

मार्क 2:13-28 MARVBSI

तो तेथून निघून समुद्रकिनार्‍यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला तेव्हा त्याने त्यांना शिक्षण दिले. तेथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकातीच्या नाक्यावर बसलेला दिसला. त्याला त्याने म्हटले, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला. नंतर असे झाले की, तो त्याच्या घरी जेवायला बसला; तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस बसले; कारण ते पुष्कळ असून त्याच्यामागे आले होते. तेव्हा परूश्यांतील शास्त्री ह्यांनी त्याला जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर जेवताना पाहून त्याच्या शिष्यांना म्हटले, “हा जकातदार व पापी लोक ह्यांच्या-बरोबर का जेवतो?” हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते; मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना पश्‍चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.” योहानाचे शिष्य व परूशी उपास करत होते; तेव्हा लोक येऊन त्याला म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूश्यांचे शिष्य उपास करतात पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्याचे कारण काय?” येशू त्यांना म्हणाला, “वर्‍हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय? वर त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपास करणे शक्य नाही. तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल; तेव्हा त्या दिवसांत ते उपास करतील. कोणी कोर्‍या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही; लावले तर धड करण्याकरता लावलेले ठिगळ त्याला, म्हणजे जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते. कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत घालत नाही; घातला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो व बुधलेही निकामी होतात; म्हणून नवा द्राक्षारस नव्याच बुधल्यांत घालतात.” मग असे झाले की तो शब्बाथ दिवशी शेतांमधून जाताना त्याचे शिष्य वाटेने कणसे मोडू लागले. तेव्हा परूशी त्याला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी करू नये ते हे का करतात?” तो त्यांना म्हणाला, “दाविदाला गरज पडली, म्हणजे त्याला व त्याच्याबरोबरच्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, अब्याथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला व याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या ‘समर्पित भाकरी’ त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबरच्यांनाही कशा खाण्यास दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय?” आणखी तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शब्बाथासाठी झालेला नाही; म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचाही प्रभू आहे.”

मार्क 2:13-28 साठी चलचित्र