YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 15:22-34

मार्क 15:22-34 MARVBSI

मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले. आणि त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस पिण्यास दिला, परंतु त्याने तो घेतला नाही. तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले, आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणता कपडा कोणी घ्यावा ह्यासाठी ‘त्यांवर चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले.’ त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता. ‘यहूद्यांचा राजा’ असा त्याच्यावरील दोषारोपाचा लेख वर लावला होता. त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. [‘आणि अपराध्यांत तो गणलेला होता’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला.] मग जवळून जाणार्‍यायेणार्‍यांनी ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा केली की, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्‍या, आपला बचाव कर, वधस्तंभावरून खाली ये.” तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह आपसांत थट्टा करत म्हणाले, “त्याने दुसर्‍यांचे तारण केले, त्याला स्वत:चा बचाव करता येत नाही. इस्राएलाचा राजा ख्रिस्त ह्याने आता वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू.” त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेली माणसेही त्याची निंदा करत होती. सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एलोई, एलोई, लमा सबक्थनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”

मार्क 15:22-34शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती