तो बोलत आहे इतक्यात बारा जणांपैकी एक म्हणजे यहूदा तेथे आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडील ह्यांच्याकडची एक टोळी तलवारी व सोटे घेऊन आली.
त्याला धरून देणार्याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेई तोच तो आहे; त्याला धरा व नीट बंदोबस्ताने घेऊन जा.”
तो आल्यावर लगेचच त्याच्याकडे गेला आणि “गुरूजी,” असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले.
तेव्हा त्या लोकांनी येशूवर हात टाकून त्याला अटक केली.
त्याच्याशेजारी जे उभे होते त्यांच्यापैकी एकाने तलवार उपसली आणि प्रमुख याजकाच्या चाकरावर वार करून त्याचा कान छाटून टाकला.
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “एखाद्या लुटारूवर तलवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरण्यास बाहेर पडला आहात काय?
मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे, पण तुम्ही मला धरले नाही; परंतु शास्त्रलेख पूर्ण व्हावेत म्हणून हे असे घडत आहे.”
तेव्हा ते सर्व त्याला सोडून पळून गेले.
तेव्हा कोणीएक तरुण उघड्या अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्यामागून चालला होता, त्याला त्यांनी धरले;
परंतु तो ते तागाचे वस्त्र टाकून त्यांच्यापासून उघडाच पळून गेला.
नंतर त्यांनी येशूला प्रमुख याजकाकडे नेले; आणि सर्व मुख्य याजक, वडील व शास्त्री एकत्र जमले.
पेत्र दुरून त्याच्यामागून चालत आत म्हणजे प्रमुख याजकाच्या वाड्यातील अंगणात गेला आणि कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला.
मुख्य याजक व सर्व न्यायसभा ह्यांनी येशूला जिवे मारण्याकरता त्याच्याविरुद्ध साक्षीचा शोध केला पण ती त्यांना मिळेना.
बर्याच जणांनी त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या साक्षीत मेळ बसेना.
काही जण उभे राहून त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले,
“हातांनी बांधलेले हे मंदिर मी मोडून टाकीन व हातांनी न बांधलेले असे दुसरे तीन दिवसांत उभारीन, असे आम्ही ह्याला बोलताना ऐकले.”
परंतु त्यांच्या ह्याही साक्षीत मेळ नव्हता.
तेव्हा प्रमुख याजकाने मध्ये उभे राहून येशूला विचारले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध साक्ष देतात हे काय?”
तथापि तो उगाच राहिला; त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा प्रमुख याजकाने त्याला विचारले, “धन्यवादिताचा पुत्र जो ख्रिस्त तो तू आहेस काय?”
येशू म्हणाला, “मी आहे; आणि तुम्ही ‘मनुष्याचा पुत्र सर्वसामर्थ्याच्या उजवीकडे बसलेला’ व ‘आकाशातील मेघांसह येत असेलला’ असा पाहाल.”
तेव्हा प्रमुख याजक आपले कपडे फाडून म्हणाला, “आपणांला साक्षीदारांची आणखी काय गरज?
हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे; तुम्हांला कसे वाटते?” तेव्हा तो मरणदंडास पात्र आहे असे सर्वांनी मिळून ठरवले.
मग कित्येक जण त्याच्यावर थुंकू लागले, त्याचे तोंड झाकून व त्याला बुक्क्या मारून म्हणू लागले, “आता दाखव आपले अंतर्ज्ञान!” आणि कामदारांनी त्याला चपराका मारून आपल्या ताब्यात घेतले.
इकडे पेत्र खाली अंगणात असता प्रमुख याजकाच्या दासींपैकी एक तेथे आली;
आणि पेत्राला शेकत असताना पाहून त्याच्याकडे तिने दृष्टी लावून म्हटले, “तूही त्या नासरेथकर येशूबरोबर होतास.”
परंतु तो नाकारून बोलला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही.” ह्यावर तो बाहेर देवडीवर गेला; इतक्यात कोंबडा आरवला.
मग त्या दासीने त्याला तेथेही पाहिले आणि जे लोक जवळ उभे होते, त्यांना ती पुन्हा सांगू लागली, “हा त्यांच्यापैकीच आहे.”
तरी त्याने पुन्हा नाकारले; मग काही वेळाने जवळ उभे राहणारे लोक पेत्राला पुन्हा म्हणाले, “तू खरोखरच त्यांच्यापैकीच आहेस, कारण तू गालीली आहेस [व तुझी बोलीही तशीच आहे.]”
परंतु तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात त्याला मी ओळखत नाही.”
तत्क्षणी दुसर्यांदा कोंबडा आरवला. तेव्हा ‘कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,’ असे जे येशू पेत्राला म्हणाला होता, ते त्याला आठवले; तेव्हा त्याचे अवसान सुटले व संकोच न करता मोठा गळा काढून तो रडू लागला.