YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 11:12-33

मार्क 11:12-33 MARVBSI

दुसर्‍या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पानांनी डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले, आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला; परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही; कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे कोणीही तुझे फळ कधीही न खावो.” त्याचे शिष्य हे ऐकत होते. मग ते यरुशलेमेस येऊन पोहचल्यावर येशू मंदिरात गेला व मंदिरात क्रय-विक्रय करणार्‍यांना बाहेर घालवून देऊ लागला. त्याने सराफांचे चौरंग व कबुतरे विकणार्‍यांच्या बैठका उलथून टाकल्या; त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरामधून नेआण करू दिली नाही. मग तो त्यांना शिक्षण देऊ लागला व म्हणाला की, “‘माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील,’ असा शास्त्रलेख आहे ना? परंतु तुम्ही तर ही ‘लुटारूंची गुहा’ करून टाकली आहे.” मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी हे ऐकले आणि त्याचा घात कसा करावा ह्याविषयी ते युक्ती योजू लागले; कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाल्याकारणाने ते त्याला भीत होते. रोज संध्याकाळी ते शहराच्या बाहेर जात असत. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पाहा.” येशूने त्यांना उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हांला खचीत सांगतो की, जो कोणी ह्या डोंगराला ‘तू उपटून समुद्रात टाकला जा,’ असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता, आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हांला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हांला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. [परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.]” मग ते पुन्हा यरुशलेमेस आले, आणि तो मंदिरात फिरत असता मुख्य याजक, शास्त्री व वडील त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि त्या करण्याचा हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?” येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हांला एक प्रश्‍न विचारतो. मला उत्तर द्या म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे ते मी तुम्हांला सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता किंवा माणसांपासून होता ह्याचे मला उत्तर द्या.” तेव्हा ते आपसांत विचार करू लागले : ‘स्वर्गापासून होता’ असे म्हणावे तर तो म्हणेल की, ‘तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ ‘माणसांपासून होता’ असे म्हणावे तर? - त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण योहान खरोखरच संदेष्टा होता असे सर्व लोक मानत. तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” येशू त्यांना म्हणाला, “तर मग कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करीत आहे ते मीही तुम्हांला सांगत नाही.”