YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 10:32-52

मार्क 10:32-52 MARVBSI

मग ते वर यरुशलेमेस जात असताना वाटेने येशू त्यांच्यापुढे चालला होता; तेव्हा ते विस्मित झाले आणि मागोमाग येणारे घाबरले. तेव्हा तो पुन्हा त्या बारा जणांस जवळ बोलावून घेऊन आपल्याला काय होणार ते त्यांना सांगू लागला, “पाहा, आपण वर यरुशलेमेस जात आहोत; तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल; ते त्याला देहान्त शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील; आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील; आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.” जब्दीचे दोघे मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “गुरूजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे.” तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” ते त्याला म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे.” येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही काय मागत आहात हे तुम्हांला समजत नाही; जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय? व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेववेल काय?” ते त्याला म्हणाले, “घेववेल.” येशूने त्यांना म्हटले, “जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे; पण माझ्या उजवीकडे व डावीकडे कोणाला बसू द्यायचे हे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार.” हे ऐकून बाकीचे दहा जण याकोब व योहान ह्यांच्यावर संतापले. तेव्हा त्यांना जवळ बोलावून घेऊन येशू त्यांना म्हणाला, “परराष्ट्रीयांत सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. परंतु तुमची गोष्ट तशी नाही; तर जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे; आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे.” नंतर ते यरीहोस आले. मग तो, त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असता, तीमयाचा मुलगा बार्तीमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेथकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.” तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले; पण तो अधिकच ओरडू लागला, “अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” तेव्हा येशू थांबून म्हणाला, “त्याला बोलवा.” मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, “धीर धर; ऊठ, तो तुला बोलावत आहे.” तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” आंधळा त्याला म्हणाला, “गुरूजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी.” येशू त्याला म्हणाला, “जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तेव्हा लगेचच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला.