मार्क 10:26-45
मार्क 10:26-45 MARVBSI
तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, “मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही; ‘देवाला सर्वकाही शक्य आहे.”’ पेत्र त्याला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्वकाही सोडून आपल्यामागे आलो आहोत.” येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता व सुवार्तेकरता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणार्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. तरी पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल.” मग ते वर यरुशलेमेस जात असताना वाटेने येशू त्यांच्यापुढे चालला होता; तेव्हा ते विस्मित झाले आणि मागोमाग येणारे घाबरले. तेव्हा तो पुन्हा त्या बारा जणांस जवळ बोलावून घेऊन आपल्याला काय होणार ते त्यांना सांगू लागला, “पाहा, आपण वर यरुशलेमेस जात आहोत; तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल; ते त्याला देहान्त शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील; आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील; आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.” जब्दीचे दोघे मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “गुरूजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे.” तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” ते त्याला म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे.” येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही काय मागत आहात हे तुम्हांला समजत नाही; जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय? व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेववेल काय?” ते त्याला म्हणाले, “घेववेल.” येशूने त्यांना म्हटले, “जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे; पण माझ्या उजवीकडे व डावीकडे कोणाला बसू द्यायचे हे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार.” हे ऐकून बाकीचे दहा जण याकोब व योहान ह्यांच्यावर संतापले. तेव्हा त्यांना जवळ बोलावून घेऊन येशू त्यांना म्हणाला, “परराष्ट्रीयांत सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. परंतु तुमची गोष्ट तशी नाही; तर जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे; आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे.”

