मग तो निघून वाटेस लागणार तोच एकाने धावत येऊन व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले, “उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे?”
येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्यावाचून कोणी उत्तम नाही.
तुला आज्ञा ठाऊकच आहेत; ‘खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नकोस, आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख.”’
त्याने त्याला उत्तर दिले, “गुरूजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे.”
येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे; जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, [वधस्तंभ घेऊन] माझ्यामागे ये.”
परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला; कारण तो फार श्रीमंत होता.
तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा!”
तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले; येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मुलांनो, [जे संपत्तीवर भरवसा ठेवतात त्यांना] देवाच्या राज्यात प्रवेश करणे कितीतरी कठीण आहे!
धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”
तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”
येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, “मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही; ‘देवाला सर्वकाही शक्य आहे.”’
पेत्र त्याला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्वकाही सोडून आपल्यामागे आलो आहोत.”
येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता व सुवार्तेकरता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे,
अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणार्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.
तरी पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल.”