YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 1:15-34

मार्क 1:15-34 MARVBSI

“काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्‍चात्ताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.” नंतर गालील समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन.” मग ते लगेच जाळी सोडून त्याला अनुसरले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले. आणि त्याने त्यांना लगेचच बोलावले; मग ते आपला बाप जब्दी ह्याला चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्यामागे गेले. नंतर ते कफर्णहूमास गेले; आणि लगेचच त्याने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नाही तर अधिकार असल्यासारखा शिकवत होता. त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता; तो ओरडून म्हणाला, “हे येशू नासरेथकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करायला आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच!” येशूने त्याला धमकावून म्हटले, “उगाच राहा व ह्याच्यातून नीघ.” तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकांना विचारू लागले, “हे आहे तरी काय? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण! हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात.” ही त्याची कीर्ती लगेच गालीलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. सभास्थानातून निघाल्यावर ते लगेचच याकोब व योहान ह्यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी गेले. शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती, तिच्याविषयी लगेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले व लगेचच तिचा ताप निघाला, आणि ती त्यांची सेवा करू लागली. संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखणाइतांना व भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले. आणि सबंध शहर दाराशी लोटले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भुते काढली; त्या भुतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही.

मार्क 1:15-34 साठी चलचित्र