YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 7:1-29

मत्तय 7:1-29 MARVBSI

तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर ती कदाचित आपल्या पायांखाली ते तुडवतील व उलटून तुम्हांला फाडतील. मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून चांगल्या देणग्या देईल? ह्याकरता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदिष्टग्रंथ ह्यांचे सार हेच आहे. अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल. मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे म्हणणार्‍या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’ तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणार्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा.’ ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणाएका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर खडकावर बांधले; मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर वाळूवर बांधले; मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले.” येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्‍क झाले; कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता.