तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले.
मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली.
तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.”
परंतु त्याने उत्तर दिले की,
“‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.”
मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले;
आणि त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की,
‘तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील,’
आणि ‘तुझा पाय धोंड्यांवर आपटू नये
म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.”’
येशूने त्याला म्हटले, “आणखी असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस.”’
पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखवले,
आणि त्याला म्हटले, “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्वकाही तुला देईन.”
तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की,
‘परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर,
व केवळ त्याचीच उपासना कर.”’
मग सैतान त्याला सोडून गेला आणि पाहा, देवदूतांनी येऊन त्याची सेवा केली.
नंतर योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालीलात निघून गेला;
आणि नासरेथ सोडून जबुलून व नफताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनार्यावरील कफर्णहूमास जाऊन राहिला;
हे अशासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की,
“जबुलून प्रांत व नफताली प्रांत,
समुद्रकिनार्यावरचा, यार्देनेच्या पलीकडचा,
परराष्ट्रीयांचा गालील -
अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय
झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व
छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.”
तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
नंतर गालील समुद्राजवळून येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात पाग टाकताना पाहिले; कारण ते मासे धरणारे होते.
त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.”
लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले.
तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपला बाप जब्दी ह्याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले, आणि त्याने त्यांना बोलावले.
मग लगेच ते तारू व आपला बाप ह्यांना मागे सोडून त्याला अनुसरले.
नंतर येशू यहूदी लोकांच्या सभास्थानांत सुवार्तेची घोषणा करत व राज्याची सुवार्ता गाजवत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करत गालीलभर फिरला.
आणि त्याची कीर्ती सूरिया देशभर पसरली; तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा ह्यांनी पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले, आणि त्याने त्यांना बरे केले.
मग गालील, दकापलीस, यरुशलेम, यहूदीया व यार्देनेच्या पलीकडचा प्रदेश ह्यांतून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागे चालले.