YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 27:51-66

मत्तय 27:51-66 MARVBSI

तेव्हा पाहा, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले; थडगी उघडली, आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली; आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर, थडग्यांतून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे, हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले व “खरोखर हा देवाचा पुत्र होता,” असे म्हणाले. तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून हे पाहत होत्या; त्या येशूची सेवा करीत गालीलाहून त्याच्यामागे आल्या होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, याकोब व योसे ह्यांची आई मरीया, व जब्दीच्या मुलांची आई ह्या होत्या. मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला, हाही येशूचा शिष्य होता. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पितालाने ते देण्याची आज्ञा केली. योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले; ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले, एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. पण तेथे कबरेसमोर मग्दालीया मरीया व दुसरी मरीया ह्या बसल्या होत्या. दुसर्‍या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक व परूशी पिलाताकडे जमून म्हणाले, “महाराज, तो ठक जिवंत असता ‘तीन दिवसांनंतर मी उठेन’ असे म्हणाला होता, ह्याची आम्हांला आठवण आहे. म्हणून तिसर्‍या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करण्यास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य [रात्री] येऊन त्याला चोरून नेतील व ‘तो मेलेल्यांतून उठला आहे’ असे लोकांना सांगतील; मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल.” पिलात त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.” मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडेवर शिक्‍कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला.