YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 26:14-25

मत्तय 26:14-25 MARVBSI

तेव्हा यहूदा इस्कर्योत नावाच्या बारा जणांतील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, “मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?” ‘त्यांनी’ त्याला ‘तीस रुपये तोलून दिले.’ तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “आपणाकरता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?” त्याने म्हटले, “नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो.”’ मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर तो बारा शिष्यांसह भोजनास बसला; आणि ते भोजन करत असताना त्याने म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्यातला एक जण मला धरून देईल.” तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागला, “प्रभूजी, मी तर नाही ना?” त्याने उत्तर दिले, “ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा; परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो, त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार! तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते.” तेव्हा त्याला धरून देणारा यहूदा ह्याने विचारले, “गुरूजी, मी तर नाही ना?” तो त्याला म्हणाला, “होय, तू म्हटले तसेच.”