YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 25:19-30

मत्तय 25:19-30 MARVBSI

मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, ‘महाराज, आपण मला पाच हजार रुपये सोपवून दिले होते; पाहा, त्यांवर मी आणखी पाच हजार रुपये मिळवले आहेत.’ त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, आपण मला दोन हजार रुपये सोपवून दिले होते; पाहा, त्यांवर मी आणखी दोन हजार रुपये मिळवले आहेत.’ त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहात; जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता; म्हणून मी भ्यालो व तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते; पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत.’ तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, ‘अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय? तर माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते हजार रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल; आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल; आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका; तेथे रडणे व दात खाणे चालेल.’