मत्तय 18:1-9
मत्तय 18:1-9 MARVBSI
त्या वेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा कोण?” तेव्हा येशूने एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ह्यास्तव जो कोणी स्वत:ला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा होय; आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. माझ्यावर विश्वास ठेवणार्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे ह्यात त्याचे हित आहे. अडखळणांमुळे जगाची केवढी दुर्दशा होणार! अडखळणे तर अवश्य होणार; परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार! तुझा हात किंवा तुझा पाय तुला अडखळवत असेल तर तो तोडून फेकून दे; दोन हात किंवा दोन पाय असून सार्वकालिक अग्नीत पडावे ह्यापेक्षा लुळे किंवा लंगडे होऊन जीवनात जावे हे तुला बरे आहे. तुझा डोळा तुला अडखळवत असेल तर तो उपटून फेकून दे; दोन डोळे असून अग्निनरकात पडावे ह्यापेक्षा एक डोळा असून जीवनात जावे हे तुला बरे आहे.

