YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 15:21-28

मत्तय 15:21-28 MARVBSI

नंतर येशू तेथून निघून सोर व सीदोन ह्या भागात गेला. आणि पाहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, “अहो प्रभूजी, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने फारच जर्जर केली आहे.” तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, “तिला पाठवून द्या; कारण ती आमच्यामागून ओरडत येत आहे.” त्याने उत्तर दिले, “इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही.” तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, “प्रभूजी, मला साहाय्य करा.” त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नाही!” तिने म्हटले, “खरेच, प्रभूजी; तरी घरची कुत्रीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चुरा खातात.” तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ होवो.” आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली.