नंतर येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले; कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणीएक मनुष्य आला; तो सभास्थानाचा अधिकारी होता; त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. कारण त्याला सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करत होता. तेव्हा बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली (जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती) व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. पण येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?” तेव्हा सर्व जण ‘मी नाही’ असे म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, “गुरूजी, लोकसमुदाय तुम्हांला दाटी करून चेंगरत आहेत! अन् तुम्ही म्हणता कोणी मला स्पर्श केला?” पण येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे.” मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणाकरता त्याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले. तेव्हा तो तिला म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा.” तो बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकार्याच्या येथून कोणी येऊन त्याला सांगितले, “तुमची मुलगी मरण पावली आहे; आता गुरूजीला श्रम देऊ नका.” ते ऐकून येशू म्हणाला, “भिऊ नका; विश्वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल.” नंतर त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप ह्यांच्याशिवाय आपल्याबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. तिच्यासाठी सर्व जण रडत व शोक करत होते; पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आहे.” तरी ती मेली हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. मग सर्वांना बाहेर घालवून त्याने तिच्या हाताला धरून, “मुली, ऊठ,” असे मोठ्याने म्हटले. तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तत्काळ उठली; मग तिला खायला द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली. तेव्हा तिचे आईबाप थक्क झाले; पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.
लूक 8 वाचा
ऐका लूक 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 8:40-56
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ