YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 6:1-11

लूक 6:1-11 MARVBSI

मग एका शब्बाथ दिवशी असे झाले की, तो शेतामधून जाताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातांवर चोळून खाऊ लागले. तेव्हा परूश्यांतील कोणी म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता?” येशूने त्यांना उत्तर दिले, “दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले, तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या ‘समर्पित भाकरी’ याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबरच्यांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?” आणखी तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.” नंतर दुसर्‍या एका शब्बाथ दिवशी असे झाले की, तो सभास्थानात जाऊन शिकवत असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस होता. तेव्हा शास्त्री व परूशी त्याच्यावर दोष ठेवण्यास सापडावा म्हणून तो शब्बाथ दिवशी रोग बरा करतो की काय हे पाहण्यास टपून राहिले. परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, “ऊठ व मध्ये उभा राहा.” मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, शब्बाथ दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य?” मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, “आपला हात लांब कर.” तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात दुसर्‍या हातासारखाच पूर्ण बरा झाला. मग त्यांचे डोके फिरले व येशूचे काय करावे ह्याविषयी ते आपसांत विचार करू लागले.

लूक 6 वाचा

ऐका लूक 6

संबंधित व्हिडिओ