YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 5:1-16

लूक 5:1-16 MARVBSI

नंतर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या1 किनार्‍याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनार्‍याला लागलेले दोन मचवे पाहिले; त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनाचा होता; त्यावर चढून तो किनार्‍यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, “खोल पाण्यात हाकार; मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.” शिमोनाने त्याला उत्तर दिले, “गुरूजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यांत सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसर्‍या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला साहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे.” कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व जण विस्मित झाले होते; तसेच शिमोनाचे भागीदार, जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, “भिऊ नकोस; येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” मग मचवे किनार्‍याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. पुढे असे झाले की, तो एका गावात असता पाहा, तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता; त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” आणि लगेचच त्याचे कुष्ठ गेले. मग त्याने त्याला निक्षून सांगितले, “कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वत:स ‘याजकाला दाखव,’ आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी अर्पण कर.” तथापि त्याच्याविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले आणि पुष्कळ लोकसमुदाय ऐकण्यास व आपले रोग बरे करून घेण्यास जमू लागले. पण तो अरण्यात अधूनमधून एकान्तात जाऊन प्रार्थना करत असे.

लूक 5 वाचा

ऐका लूक 5

संबंधित व्हिडिओ