त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण यरुशलेमेपासून सुमारे चार कोसांवरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करत होते. आणि असे झाले की, ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला; परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या?” तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लयपा नावाच्या इसमाने त्याला उत्तर दिले, “अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय?” तो त्यांना म्हणाला, “कसल्या गोष्टी?” त्यांनी त्याला म्हटले, “नासरेथकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या समोर, कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकार्यांनी देहान्त शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले. परंतु इस्राएलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झाल्या तेव्हापासून आज तिसरा दिवस आहे. आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी तर आम्हांला थक्कच केले. त्यांना त्याचे शरीर सापडले नाही, तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की, आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले; व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. मग आमच्याबरोबर जे होते त्यांपैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले; पण त्यांना तो दिसला नाही.” मग तो त्यांना म्हणाला, “अहो निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो! ख्रिस्ताने ही दु:खे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे, ह्याचे अगत्य नव्हते काय?” मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखांतील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. मग ज्या गावाला ते जात होते त्याच्याजवळ ते आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोख दाखवला; परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, “आमच्याबरोबर राहा; कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे.” तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहायला आत गेला. मग असे झाले की, तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले; मग तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?” मग त्याच घटकेस ते उठून यरुशलेमेस माघारी गेले, तेव्हा अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. ते म्हणत होते की, “प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला.” मग त्यांनी वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले. ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो.”
लूक 24 वाचा
ऐका लूक 24
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 24:13-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ