YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 23:13-49

लूक 23:13-49 MARVBSI

मग पिलाताने मुख्य याजक, अधिकारी व लोक ह्यांना एकत्र बोलावून म्हटले, “हा मनुष्य लोकांना फितवणारा म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले; आणि पाहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही; हेरोदालाही सापडला नाही; कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठवले आहे; आणि पाहा, ह्याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही. म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो.” [कारण त्या सणात त्याला त्यांच्याकरता एकाला सोडावे लागत असे.] परंतु सर्वांनी एकच ओरडा करून म्हटले, “ह्याची वाट लावा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.” हा माणूस शहरात झालेला दंगा व खून ह्यांमुळे तुरुंगात टाकलेला होता. येशूला सोडावे ह्या इच्छेने पिलाताने पुन्हा त्यांच्याबरोबर भाषण केले. तरी “ह्याला वधस्तंभावर खिळा,” “वधस्तंभावर खिळा,” असे ते ओरडत राहिले. तो त्यांना तिसर्‍यांदा म्हणाला, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे? त्याच्याकडे मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही; म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो.” पण ‘ह्याला वधस्तंभावर खिळाच’ असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालवला; आणि त्यांच्या व मुख्य याजकांच्या ओरडण्याला यश आले. तेव्हा त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असा पिलाताने निकाल दिला. नंतर दंगा व खून ह्यांमुळे तुरुंगात टाकलेल्या ज्याला त्यांनी मागितले होते त्याला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या मर्जीवर सोपवून दिले. पुढे ते त्याला घेऊन जात असता कोणीएक कुरेनेकर शिमोन शेतावरून येत होता. त्याला त्यांनी धरून त्याच्यावर वधस्तंभ लादला आणि त्याला येशूच्या मागे तो वाहण्यास लावले. तेव्हा त्याच्यामागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण पाहा, असे दिवस येतील की ज्यांत वांझ, न प्रसवलेली उदरे, व न पाजलेले स्तन ही धन्य आहेत असे म्हणतील. त्या समयी ते ‘पर्वतांना म्हणू लागतील, आमच्यावर पडा, व टेकड्यांना म्हणतील, आम्हांला झाका.’ ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय होईल?” त्याच्याबरोबर दुसर्‍या दोघा जणांस ते अपराधी असल्यामुळे वधस्तंभावर खिळण्यासाठी नेले. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना, एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभांवर खिळले. तेव्हा येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” नंतर त्याची ‘वस्त्रे आपसांत वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.’ लोक ‘पाहत’ उभे होते; अधिकारीही ‘नाक मुरडत म्हणाले,’ “त्याने दुसर्‍यांना वाचवले, जर तो देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःस वाचवावे.” शिपायांनीही जवळ येऊन ‘आंब’ त्याच्यापुढे धरून, त्याची अशी थट्टा केली की, “तू यहूद्यांचा राजा असलास तर स्वतःला वाचव.” हा यहूद्यांचा राजा आहे, असा [हेल्लेणी, रोमी, व इब्री अक्षरांत लिहिलेला] एक लेखही त्याच्या वरती होता. वधस्तंभांवर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हांलाही वाचव.” परंतु दुसर्‍याने त्याचा निषेध करून म्हटले, “तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवालासुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे; कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत; परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही.” मग तो म्हणाला, “अहो येशू,1 आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” आता सुमारे दोन प्रहर झाले, आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तिसर्‍या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला; आणि पवित्रस्थानातील पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, “हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो!” असे बोलून त्याने प्राण सोडला. तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.” हे दृश्य पाहण्याकरता जमलेले सर्व लोकसमुदाय झालेल्या घटना पाहून ऊर बडवीत परत गेले. तेव्हा त्याच्या ‘ओळखीचे’ सर्व जण व ज्या स्त्रिया त्याच्यामागे गालीलाहून आल्या होत्या त्या हे पाहत ‘दूर उभ्या राहिल्या होत्या.’