YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 19:29-48

लूक 19:29-48 MARVBSI

मग असे झाले की, ज्याला जैतुनांचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेथफगे व बेथानी ह्या गावांजवळ तो येऊन पोहचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले, “तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हांला आढळेल; ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हांला विचारलेच, तर ‘प्रभूला ह्याची गरज आहे,’ असे सांगा.” तेव्हा ज्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्यांना त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडत असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, “शिंगरू का सोडता?” तेव्हा ते म्हणाले, “प्रभूला ह्याची गरज आहे.” मग त्यांनी ते येशूकडे आणले, आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले. आणि जसजसा तो पुढे चालला तसतसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेले. तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहचताच सर्व शिष्यसमुदाय, जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, “‘प्रभूच्या नावाने येणारा’ राजा ‘धन्यवादित असो;’ स्वर्गात शांती, आणि ऊर्ध्वलोकी गौरव.” तेव्हा लोकसमुदायातील काही परूश्यांनी त्याला म्हटले, “गुरूजी, आपल्या शिष्यांना दटावा.” त्याने म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.” यरुशलेमेकडे पाहून येशूने केलेला विलाप मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरता रडत रडत म्हणाला, “जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील, तुला व ‘तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील’ आणि तुझ्यामध्ये चिर्‍यावर चिरा राहू देणार नाहीत; कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस.” नंतर तो मंदिरात गेला व त्यात जे विक्री करत [व विकत घेत] होते त्यांना तो बाहेर घालवू लागला; आणि त्यांना म्हणाला, “‘माझे घर प्रार्थनेचे घर होईल,’ असा शास्त्रलेख आहे; परंतु त्याची तुम्ही ‘लुटारूंची गुहा’ केली आहे.” तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे; पण मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करण्यास पाहत असत. तरी काय करावे हे त्यांना सुचेना; कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.