YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 19:11-26

लूक 19:11-26 MARVBSI

ते ह्या गोष्टी ऐकत असता त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला; कारण तो यरुशलेमेजवळ होता, आणि देवाचे राज्य आताच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते. तो म्हणाला, “कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूर देशी गेला. त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा.’ त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत, म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ‘ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही.’ मग असे झाले की, तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळवले हे पाहावे म्हणून त्याने त्यांना आपणाकडे बोलावण्यास सांगितले. मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत.’ त्याने त्याला म्हटले, ‘शाबास, भल्या दासा; तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे.’ नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमवल्या आहेत.’ त्यालाही त्याने म्हटले, ‘तुलाही पाच नगरांवर अधिकार दिला आहे.’ मग आणखी एक येऊन म्हणाला, ‘महाराज, ही पाहा आपली मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती. कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली; जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता.’ तो त्याला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरले नाही त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते काय? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असतास तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’ मग त्याने जवळ उभे राहणार्‍यांना सांगितले, ‘ह्याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’ ते त्याला म्हणाले, ‘महाराज, त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहेत!’ मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल, आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे तेदेखील त्याच्यापासून घेतले जाईल.