मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका; कारण तेही कदाचित तुम्हांला उलट आमंत्रण करतील व तुमची फेड होईल.
तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, अपंग, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण करा;
म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करण्यास त्यांच्याजवळ काही नाही; तरी नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल.”
मग त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी कोणीएकाने ह्या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, “जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य!”
त्याने त्याला म्हटले, “कोणाएका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली, तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले.
आणि जेवणाच्या वेळेस, ‘आता या, तयारी झाली आहे,’ असे आमंत्रितांना सांगायला त्याने आपल्या एका दासाला पाठवले.
तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे; मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’
दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासायला जातो; मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’
आणखी एक जण म्हणाला, ‘मी लग्न केले आहे, म्हणून माझे येणे होत नाही.’
मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधन्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, ‘नगराच्या रस्त्यांत व गल्ल्यांत लवकर जा, आणि दरिद्री, अपंग, आंधळे व लंगडे ह्यांना इकडे घेऊन ये.’
दास म्हणाला, ‘महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापि जागा आहे.’
धनी दासाला म्हणाला, ‘माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व कुंपणांकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये.
कारण मी तुम्हांला सांगतो की, त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.”’