इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले; तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “तुम्ही आपणांस परूश्यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा.
जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही.
जे काही तुम्ही अंधारात बोललात ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही आतल्या कोठड्यांत कानात सांगितले ते धाब्यांवर गाजवले जाईल.
माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात, पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका.
तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा; हो, मी तुम्हांला सांगतो, त्याचीच भीती बाळगा.
पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात की नाही? तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही.
फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका; तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात.
मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील;
परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल.
आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल; परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही.
जेव्हा तुम्हांला सभा, सरकार व अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्यांविषयी काळजी करू नका;
कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.”
लोकसमुदायातील कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.”
तो त्याला म्हणाला, “गृहस्था, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले?”
आणखी त्याने त्यांना म्हटले, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.”
त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले.
तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, ‘मी काय करू? कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही.’
मग त्याने म्हटले, ‘मी असे करीन; मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन; आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन.
मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.’
परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस, ते कोणाचे होईल?’
जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.”