YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 11:24-36

लूक 11:24-36 MARVBSI

मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जल स्थळांमधून विश्रांतीचा शोध करत हिंडतो आणि ती न मिळाल्यास तो म्हणतो, ‘ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन.’ आणि तो आल्यावर त्याला ते झाडलेले व सुशोभित केलेले आढळते. नंतर तो जाऊन त्याच्यापेक्षा दुष्ट असे सात आत्मे बरोबर घेतो; आणि ते आत शिरून तेथे राहतात; मग त्या मनुष्याची ती शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते.” मग असे झाले की, तो ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणीएक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, “ज्या उदराने तुझा भार वाहिला व जी स्तने तू चोखलीस ती धन्य!” तेव्हा तो म्हणाला, “पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!” तेव्हा लोकसमुदाय त्याच्याजवळ एकत्र जमत असताना तो असे म्हणू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागते; परंतु योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील; कारण शलमोनाचे ज्ञान ऐकण्यास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली; आणि पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्‍चात्ताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली कोणी ठेवत नाही, तर आत येणार्‍यांना उजेड दिसावा म्हणून दिवठणीवर ठेवतो. तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा होय; तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते; सदोष असला तर तुझे शरीरही अंधकारमय असते. म्हणून तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना, हे पाहा. तुझे सर्व शरीर प्रकाशमय असेल आणि त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल, तर दिवा आपल्या उज्ज्वल ज्योतीने तुला प्रकाशमय करतो त्याप्रमाणे ते पूर्णपणे प्रकाशमय होईल.”

संबंधित व्हिडिओ