YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 11:1-28

लूक 11:1-28 MARVBSI

मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करत होता; ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले तसे आपणही आम्हांला शिकवा.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा : “हे [आमच्या स्वर्गातील] पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. [जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.] आमची रोजची भाकर रोज आम्हांला दे; आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो; आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस, [तर आम्हांला वाइटापासून सोडव.]” मग त्याने त्यांना म्हटले, “तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे; कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही;’ आणि तो आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नकोस; आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत; मी उठून तुला देऊ शकत नाही’? मी तुम्हांला सांगतो, तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे, की जो आपल्या मुलाने भाकर मागितली असता धोंडा देईल? किंवा मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाईट असताही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” एकदा तो एक भूत काढत होता व ते मुके होते. तेव्हा असे झाले की, भूत निघाल्यावर मुका बोलू लागला; त्यावरून लोकसमुदायास आश्‍चर्य वाटले. पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बाल्जबूल त्याच्या साहाय्याने हा भुते काढतो”; आणि दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याच्याजवळ स्वर्गीय चिन्ह मागू लागले. परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते, आणि घरावर घर पडते. सैतानातही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? कारण मी बाल्जबूलाच्या साहाय्याने भुते काढतो असे तुम्ही म्हणता. पण मी जर बाल्जबूलाच्या साहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? ह्यामुळे तेच तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने1 भुते काढत आहे, तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते; परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो, तेव्हा ज्या शस्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे; आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळतो. मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जल स्थळांमधून विश्रांतीचा शोध करत हिंडतो आणि ती न मिळाल्यास तो म्हणतो, ‘ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन.’ आणि तो आल्यावर त्याला ते झाडलेले व सुशोभित केलेले आढळते. नंतर तो जाऊन त्याच्यापेक्षा दुष्ट असे सात आत्मे बरोबर घेतो; आणि ते आत शिरून तेथे राहतात; मग त्या मनुष्याची ती शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते.” मग असे झाले की, तो ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणीएक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, “ज्या उदराने तुझा भार वाहिला व जी स्तने तू चोखलीस ती धन्य!” तेव्हा तो म्हणाला, “पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!”

संबंधित व्हिडिओ