YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 10:1-24

लूक 10:1-24 MARVBSI

ह्यानंतर प्रभूने आणखी बाहत्तर3 जणांना नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वत: जाणार होता तेथे दोघे-दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. आता जा; पाहा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवत आहे. पिशवी, झोळी किंवा पायतण बरोबर घेऊ नका; वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे, ‘ह्या घरास शांती असो,’ असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील; नसला तर तुमच्याकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरोघर फिरू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हांला वाढतील ते खा. त्यात जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की, ‘देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.’ तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यांवर बाहेर जाऊन असे म्हणा : ‘आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावची धूळदेखील तुमची तुम्हांला झाडून टाकतो; तथापि हे लक्षात ठेवा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.’ मी तुम्हांला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे जाईल. हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन बसून पश्‍चात्ताप केला असता. ह्यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर व सीदोन ह्यांना सोपे जाईल. हे कफर्णहूमा, ‘तू आकाशापर्यंत चढवले जाशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील.’ जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो; जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो; आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो.” नंतर ते बाहत्तर1 जण आनंदाने परत येऊन म्हणाले, “प्रभूजी, आपल्या नावाने भुतेदेखील आम्हांला वश होतात.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले. पाहा, मी तुम्हांला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हांला काहीएक बाधणार नाही. तथापि भुते तुम्हांला वश होतात ह्याचा आनंद मानू नका; तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना.” त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात उल्लसित होऊन म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या आहेत; होय, पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले. माझ्या पित्याने सर्वकाही माझ्या स्वाधीन केले आहे; पुत्र कोण आहे हे पित्यावाचून कोणाला ठाऊक नाही; आणि पिता कोण आहे हे पुत्रावाचून व ज्याला तो प्रकट करायची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून कोणाला ठाऊक नाही.” मग शिष्यांकडे वळून तो त्यांना एकान्तात म्हणाला, “तुम्ही जे पाहत आहात ते पाहणारे डोळे धन्य होत! मी तुम्हांला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी इच्छा बाळगली तरी त्यांना पाहायला मिळाले नाही; आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकण्याची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकायला मिळाले नाही.”

संबंधित व्हिडिओ