YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 4:20-35

लेवीय 4:20-35 MARVBSI

पापार्पणाच्या गोर्‍ह्याचे जसे करायचे तसेच ह्याचेही करावे; ह्या प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्यांची क्षमा होईल. पहिला गोर्‍हा जाळून टाकायचा तसाच हाही गोर्‍हा छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे मंडळीसाठी पापार्पण होय. आपला देव परमेश्वर ह्याने निषिद्ध ठरवलेले कोणतेही कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून एखादा अधिपती दोषी ठरला, आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले, तर त्याने एक दोषहीन बकरा बली देण्यासाठी आणावा; त्याने त्या बकर्‍याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय. मग याजकाने आपल्या बोटाने त्या पापार्पणाचे थोडे रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. शांत्यर्पणाच्या यज्ञपशूंच्या चरबीप्रमाणे ह्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; ह्या प्रकारे त्याच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल. परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून सामान्य लोकांपैकी कोणी दोषी ठरला, आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले, तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण करण्यासाठी एक दोषहीन बकरी आणावी. त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात त्या ठिकाणी त्याचा वध करावा. मग याजकाने त्याचे थोडे रक्त बोटाने घेऊन ते होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे सर्व रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. आणि शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे ह्याचीही सर्व चरबी वेगळी काढून घ्यावी व ती परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून याजकाने तिचा वेदीवर होम करावा; याजकाने त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल. त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरू आणले तर ती दोषहीन मादी असावी. त्याने पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणासाठी त्याचा वध करावा. याजकाने आपल्या बोटाने पापबलीचे थोडे रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. आणि शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि वेदीवर असलेल्या हव्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ तिचा होम करावा; ह्या प्रकारे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.