YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 26:23-33

लेवीय 26:23-33 MARVBSI

एवढ्या गोष्टी करूनही तुम्ही सुधारून माझ्याकडे वळला नाहीत आणि माझ्याविरुद्ध वागलात, तर मीही तुमच्या अगदी विरुद्ध जाईन आणि मीच तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन. मी तुमच्यावर तलवार आणीन, ती करार मोडल्याचा बदला घेईल; तुम्ही आपापल्या नगरात जमा व्हाल, तेव्हा मी तुमच्यावर मरी पाठवीन; मी तुम्हांला तुमच्या शत्रूच्या स्वाधीन करीन. मी तुमच्या भाकरीचा आधार मोडीन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच भट्टीत तुमची भाकर भाजतील आणि ती तुम्हांला तोलून परत देतील; ती खाऊन तुमची तृप्ती व्हायची नाही. एवढे सर्व करूनही माझे तुम्ही ऐकले नाही व माझ्याविरुद्ध वागलात, तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन. आपल्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुमच्यावर येईल. तुमच्या पूजेची उच्च स्थाने मी उद्ध्वस्त करीन, तुमच्या सूर्यमूर्ती1 फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तींच्या मढ्यांवर तुमची मढी फेकून देईन; माझ्या जिवाला तुमची किळस येईल. मी तुमची नगरे उजाड करीन, तुमची पवित्रस्थळे ओसाड करीन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा वास मी घेणार नाही. मी देशाची नासाडी करीन व हे पाहून देशात वसणारे तुमचे शत्रू चकित होतील. परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन; तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील.