YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 23:33-43

लेवीय 23:33-43 MARVBSI

परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग : त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराप्रीत्यर्थ मांडवांचा सण पाळावा. पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये. सात दिवस परमेश्वराला हव्य अर्पावे व आठव्या दिवशी आपला पवित्र मेळा भरवून परमेश्वराला हव्य अर्पावे; सणाचा हा समारोपदिन होय. त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. परमेश्वराचे नेमलेले समय हे होत. त्यांत हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण त्या त्या दिवसानुसार परमेश्वराला अर्पण करण्यासाठी पवित्र मेळे भरवावेत असे तुम्ही जाहीर करावे; ह्याशिवाय तुम्ही परमेश्वराचे शब्बाथ पाळावेत, भेटी अर्पाव्यात, सर्व नवस फेडावेत आणि परमेश्वराला स्वसंतोषाची सर्व अर्पणे करावीत. जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराप्रीत्यर्थ सण पाळावा; पहिला दिवस व आठवा दिवस हे परमविश्रामदिन होत. पहिल्या दिवशी तुम्ही चांगल्या झाडांची फळे, खजुरीच्या झावळ्या, दाट पालवीच्या झाडांच्या डाहळ्या, ओहळालगतची वाळुंजे ही आणून परमेश्वर तुमचा देव ह्याच्यासमोर सात दिवस उत्सव करावा. प्रतिवर्षी सात दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा. तुम्ही सात दिवस मांडवात राहावे; जितके जन्मतः इस्राएल आहेत त्यांनी मांडवात राहावे; म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की, मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले तेव्हा मांडवात त्यांना राहायला लावले; मी परमेश्वर तुमचा देव आहे.” ह्याप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांना नेमलेले समय कळवले.