YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 15:19-31

लेवीय 15:19-31 MARVBSI

एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने सात दिवस दूर बसावे; जो कोणी तिला शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; ती दूर असेपर्यंत ज्यावर ती निजेल ते अशुद्ध होय; तसेच ज्यावर ती बसेल तेही अशुद्ध होय. जो कोणी तिच्या अंथरुणाला शिवेल त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. ती ज्यावर बसली असेल त्याला जो कोणी शिवेल त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्याला शिवणार्‍याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. तिच्याशी संभोग करताना पुरुषाला तिचा विटाळ लागला तर त्याने सात दिवस अशुद्ध राहावे व ज्या अंथरुणावर तो निजेल तेही अशुद्ध समजावे. एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असला अथवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली, तर तिचे स्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसांप्रमाणे समजावेत. ती अशुद्ध होय. ती ऋतुमती असेल तितके सगळे दिवस ती ज्या अंथरुणावर निजेल ते तिच्या विटाळाचे अंथरूण समजावे; त्याचप्रमाणे ती ज्यावर बसेल ते तिच्या ऋतुकालाच्या विटाळाप्रमाणे अशुद्ध समजावे. जो कोणी त्या वस्तूंना शिवेल तो अशुद्ध होय. त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. पण त्या स्त्रीने आपल्या स्रावापासून शुद्ध झाल्यावर मोजून सात दिवस थांबावे; त्यानंतर ती शुद्ध ठरेल. आठव्या दिवशी तिने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी याजकाकडे जावे. मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे आणि तिच्या स्रावाच्या अशुद्धतेमुळे तिच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्‍चित्त करावे. ह्या प्रकारे तुम्ही इस्राएल लोकांना त्यांच्या अशुद्धतेपासून दूर ठेवावे म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले माझे निवासस्थान ते भ्रष्ट करणार नाहीत, आणि आपल्या अशुद्धावस्थेत मरायचे नाहीत.”