मी त्याच्या क्रोधरूप दंडाचे दु:ख भोगलेला मनुष्य आहे.
त्याने मला घेऊन जाऊन, उजेडात नव्हे, तर अंधारात चालायला लावले.
खरोखर तो दिवसभर माझ्याविरुद्ध आपला हात राहून राहून चालवतो.
त्याने माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहे; त्याने माझी हाडे मोडली आहेत.
त्याने विष व दु:ख ह्यांचा कोट माझ्याभोवती रचला आहे.
जे मागेच मरून गेले त्यांच्याप्रमाणे मला तो अंधकारमय स्थळी बसवतो.
त्याने माझ्याभोवती कुंपण केले म्हणून माझ्याने बाहेर पडवत नाही; त्याने माझी बेडी भारी केली.
मी धावा करतो व गार्हाणे करतो, तेव्हा तो माझ्या विनवणीस प्रतिबंध करतो.
त्याने माझ्या मार्गाभोवती चिर्यांची भिंत बांधली आहे; त्याने माझ्या वाटा वाकड्या केल्या आहेत.
टपणार्या अस्वलासारखा, गुप्त जागी असलेल्या सिंहासारखा, तो मला झाला आहे.
त्याने मला वाटेवरून लोटून देऊन माझे फाडून तुकडे केले आहेत; त्याने मला उदास केले आहे.
त्याने आपले धनुष्य वाकवले आहे, त्याने मला बाणाचे निशाण केले आहे.
त्याने आपले बाण माझ्या अंतर्यामात शिरवले आहेत.
मी आपल्या सर्व लोकांत दिवसभर उपहासाचा व निंदाव्यंजक पोवाड्यांचा विषय झालो आहे.
त्याने मला क्लेशाने व्यापले आहे, तो मला कडू दवणा पाजतो.
त्याने मला आपल्या दातांनी खडे फोडायला लावले आहे; त्याने मला राखेने माखून काढले आहे.
तू माझ्या जिवाला शांतीपासून दूर ठेवले आहेस; समृद्धीला मी पारखा झालो आहे.
तेव्हा मी म्हणालो, “माझी जीवनशक्ती, परमेश्वराची मला वाटत असलेली आशा, गेली आहे.”
माझी विपत्ती व माझे भ्रमण, कडू दवणा व विष ह्यांचे स्मरण कर.
माझा जीव त्यांचे स्मरण करीत राहतो म्हणून तो माझ्या ठायी गळला आहे.
हे मी मनात आणतो म्हणून मला आशा आहे.
आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही.
ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे.
“परमेश्वर माझा वतनभाग आहे”, असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन.
जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना, जो जीव त्याला शरण जातो त्याला, परमेश्वर प्रसन्न होतो.
परमेश्वरापासून येणार्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे.
मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे.
त्याने एकान्ती बसावे व स्वस्थ असावे, कारण त्याने त्याच्यावर हे ओझे ठेवले आहे.
त्याने आपले तोंड मातीत खुपसावे, कदाचित अद्यापि आशा असेल.
मारत्या इसमाकडे त्याने आपला गाल करावा; त्याने उपहास सोसावा.
कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही;
तो जरी दु:ख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करतो.
तो कोणास मुद्दाम पीडा करीत नाही, मानवपुत्रांना दु:ख देत नाही.
पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना पायांखाली तुडवणे,
परात्पराच्या समक्ष मनुष्याचे हक्क बुडवणे,
कोणाचा दावा बिघडवणे, असली कृत्ये प्रभू पाहत नाही काय?
प्रभूने आज्ञा केली नसल्यास कोण बोलला आणि त्याप्रमाणे घडून आले?
अनिष्ट व इष्ट ही परात्पराच्या मुखातून येत नाहीत काय?
आपल्या पातकांबद्दल शिक्षा होते म्हणून जिवंत मनुष्याने का कुरकुर करावी?
चला, आपण आपले मार्ग शोधू व तपासू, आणि परमेश्वराकडे परत जाऊ.
आपण आपले हात वर स्वर्गांतील देवाकडे करून आपली अंत:करणे त्याच्याकडे उन्नत करू.
“आम्ही अपराध केला व फितुरी केली; त्याची तू क्षमा केली नाहीस.
तू क्रोधव्याप्त होऊन आमचा छळ केलास तू वधलेस, दया केली नाहीस.
तू आपणा स्वत:स अभ्राने आच्छादलेस, प्रार्थनेचा त्यामधून प्रवेश होत नाही.
तू आम्हांला राष्ट्रांमध्ये हेंदर व केरकचरा केले आहेस.
आमच्या सर्व शत्रूंनी आमच्यावर आपले तोंड वासले आहे.
भय व गर्ता, विध्वंस व नाश ही आम्हांला प्राप्त झाली आहेत.
माझ्या लोकांच्या कन्येचा विनाश झाल्यामुळे माझे डोळे अश्रुप्रवाह ढाळत आहेत.
माझे डोळे वाहत आहेत, थांबत नाहीत, कधी खळत नाहीत;
परमेश्वर आकाशातून अवलोकन करीपर्यंत ते खळायचे नाहीत.
माझ्या नगरात सर्व कन्यांमुळे माझे डोळे माझ्या जिवास दुःख देत आहेत.
निष्कारण बनलेल्या माझ्या वैर्यांनी पक्ष्याचा करावा तसा माझा पाठलाग केला आहे.
गर्तेत ढकलून त्यांनी माझ्या जिवाचा अंत केला आहे, माझ्यावर दगड लोटला आहे.
माझ्या डोक्यावरून पाण्याचे लोट गेले; मी म्हणालो, ‘माझा अंत होत आहे.’
हे परमेश्वरा, अतिशय खोल गर्तेतून मी तुझ्या नामाचा धावा केला.
तू माझी वाणी ऐकलीस; माझ्या उसाशाला; माझ्या आरोळीला, आपला कान बंद करू नकोस.
मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास; तू म्हणालास भिऊ नकोस.
हे प्रभू, तू माझ्या जिवाच्या पक्षाने लढलास; तू माझ्या जिवास उद्धरलेस.
हे परमेश्वरा, माझा अन्याय झाला तो तू पाहिला आहेस; तू माझा न्याय कर.
त्यांनी उगवलेला सर्व सूड, त्यांच्या माझ्याविषयीच्या सर्व योजना, तू पाहिल्या आहेत.
हे परमेश्वरा, माझ्याविरुद्ध त्यांनी केलेली निंदा व त्यांच्या सर्व योजना तू ऐकल्या आहेत.
माझ्यावर उठणार्यांच्या तोंडचे शब्द व दिवसभर चाललेला त्यांचा माझ्याविषयीचा कट तू ऐकला आहेस.
तू त्यांचे उठणेबसणे पाहा; मी त्यांचे उपहासगीत झालो आहे.
हे परमेश्वरा, त्यांच्या हातच्या कर्माप्रमाणे तू त्यांना प्रतिफळ देशील.
हृदयाची कठोरता हा आपला शाप तू त्यांना देशील.
तू क्रोधाने त्यांचा पाठलाग करशील, व परमेश्वराच्या आकाशाखालून तू त्यांचा विध्वंस करशील.”