YouVersion लोगो
सर्च आयकॉन

विलापगीत 3:1-20

विलापगीत 3:1-20 MARVBSI

मी त्याच्या क्रोधरूप दंडाचे दु:ख भोगलेला मनुष्य आहे. त्याने मला घेऊन जाऊन, उजेडात नव्हे, तर अंधारात चालायला लावले. खरोखर तो दिवसभर माझ्याविरुद्ध आपला हात राहून राहून चालवतो. त्याने माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहे; त्याने माझी हाडे मोडली आहेत. त्याने विष व दु:ख ह्यांचा कोट माझ्याभोवती रचला आहे. जे मागेच मरून गेले त्यांच्याप्रमाणे मला तो अंधकारमय स्थळी बसवतो. त्याने माझ्याभोवती कुंपण केले म्हणून माझ्याने बाहेर पडवत नाही; त्याने माझी बेडी भारी केली. मी धावा करतो व गार्‍हाणे करतो, तेव्हा तो माझ्या विनवणीस प्रतिबंध करतो. त्याने माझ्या मार्गाभोवती चिर्‍यांची भिंत बांधली आहे; त्याने माझ्या वाटा वाकड्या केल्या आहेत. टपणार्‍या अस्वलासारखा, गुप्त जागी असलेल्या सिंहासारखा, तो मला झाला आहे. त्याने मला वाटेवरून लोटून देऊन माझे फाडून तुकडे केले आहेत; त्याने मला उदास केले आहे. त्याने आपले धनुष्य वाकवले आहे, त्याने मला बाणाचे निशाण केले आहे. त्याने आपले बाण माझ्या अंतर्यामात शिरवले आहेत. मी आपल्या सर्व लोकांत दिवसभर उपहासाचा व निंदाव्यंजक पोवाड्यांचा विषय झालो आहे. त्याने मला क्लेशाने व्यापले आहे, तो मला कडू दवणा पाजतो. त्याने मला आपल्या दातांनी खडे फोडायला लावले आहे; त्याने मला राखेने माखून काढले आहे. तू माझ्या जिवाला शांतीपासून दूर ठेवले आहेस; समृद्धीला मी पारखा झालो आहे. तेव्हा मी म्हणालो, “माझी जीवनशक्‍ती, परमेश्वराची मला वाटत असलेली आशा, गेली आहे.” माझी विपत्ती व माझे भ्रमण, कडू दवणा व विष ह्यांचे स्मरण कर. माझा जीव त्यांचे स्मरण करीत राहतो म्हणून तो माझ्या ठायी गळला आहे.