YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 6:17-25

यहोशवा 6:17-25 MARVBSI

हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे, मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्याबरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते. तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वथा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यांतली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात घालाल. पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.” तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला; लगेच लोकांनी आपापल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते हस्तगत केले. त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, गुरेमेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला. तेव्हा जे दोन पुरुष तो देश हेरायला गेले होते त्यांना यहोशवा म्हणाला, “तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा.” तेव्हा त्या तरुण हेरांनी आत जाऊन राहाबेला, तिच्या आईबापांना, भाऊबंदांना आणि तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्राएलाच्या छावणीबाहेर नेऊन ठेवले. मग त्यांनी ते नगर व त्यातले सर्वकाही आग लावून जाळले; मात्र सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली. यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या बापाचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले; तिचा वंश आजपर्यंत इस्राएल लोकांमध्ये वसत आहे; कारण जे जासूद यरीहो हेरायला यहोशवाने पाठवले होते, त्यांना तिने लपवून ठेवले होते.