यार्देनेपासून पश्चिमेस महासमुद्रापर्यंतची ही उरलेली राष्ट्रे आणि ज्या राष्ट्रांचा मी संहार केला आहे ती मी तुम्हांला तुमच्या वंशांचे वतन व्हावे म्हणून वाटून दिली आहेत. आणि तुमचा देव परमेश्वर स्वत: त्यांना तुमच्यापुढून हाकून लावील आणि तुमच्या दृष्टीसमोरून घालवून देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांचा देश वतन करून घ्याल. म्हणून मोठी हिंमत धरा, मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथांत जे लिहिले आहे ते सगळे काळजीपूर्वक पाळा, त्यापासून उजवीडावीकडे वळू नका; तुमच्यामध्ये ही जी राष्ट्रे राहिली आहेत त्यांच्यात मिसळून जाऊ नका; त्यांच्या देवांचे नावही घेऊ नका, त्यांची शपथ कोणाला वाहायला लावू नका, त्यांची सेवा करू नका, त्यांना दंडवत घालू नका; तर तुम्ही आजवर आपला देव परमेश्वर ह्याला धरून राहिला आहात तसेच राहा. परमेश्वराने तुमच्यापुढून मोठमोठी व बलाढ्य राष्ट्रे घालवून दिली आहेत; तुमच्यासमोर तर आजवर कोणीही टिकला नाही. तुमच्यातला एक जण हजारांना पळवून लावील, कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला सांगितल्याप्रमाणे तो स्वतः तुमच्यासाठी लढणारा आहे. म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम करण्याची तुम्ही खबरदारी घ्या; पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्यापासून परावृत्त व्हाल, तुमच्यात वस्ती करून असलेल्या उरलेल्या राष्ट्रांना धरून राहाल व त्यांच्याशी सोयरीक करून दळणवळण ठेवाल, तर हे पक्के समजा की, ह्यापुढे तुमचा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांना तुमच्या दृष्टीपुढून घालवून देणार नाही, पण ती तुम्हांला पाश व सापळा, तुमच्या कुशीला चाबूक व डोळ्यांना काटे अशी होतील; आणि अखेरीस जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला दिली आहे तिच्यातून तुमचा नायनाट होईल. मी जगाच्या रहाटीप्रमाणे आता जात आहे. तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्वर ह्याने तुमच्या बाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकही निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यांतली एकही व्यर्थ गेली नाही. तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला सांगितलेल्या सर्व हिताच्या गोष्टी सिद्धीस गेल्या त्याप्रमाणेच अहिताचे प्रसंग परमेश्वर तुमच्यावर आणील आणि ही जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला दिली आहे तिच्यामधून तुमचा नायनाट करील. तुमचा देव परमेश्वर ह्याने जो करार पाळण्याची तुम्हांला आज्ञा दिली आहे त्याचे उल्लंघन करून अन्य देवांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकेल आणि जो उत्तम देश त्याने तुम्हांला दिला आहे त्यातून तुमचा नायनाट त्वरित होईल.”
यहोशवा 23 वाचा
ऐका यहोशवा 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहोशवा 23:4-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ